ग्वाल्हेर : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर-झाशी महामार्गावर एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये फॉर्च्यूनर कारमधून प्रवास करणाऱ्या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ग्वाल्हेरमधील मालवा कॉलेजसमोर हा अपघात झाला. वेगाने येणारी फॉर्च्यूनर कार वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि सर्व तरुणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्यूनर ग्वाल्हेरकडे जात होती. महामार्गावर वाळूने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पुढे जात होती. अचानक फॉर्च्यूनर मागून ट्रॉलीला धडकली. जास्त वजनामुळे ट्रॉली जास्त हलली नाही, मात्र वेगाने जाणाऱ्या कारचा चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज आला, त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि रुग्णवाहिका बोलावली.
भीषण अपघाताची माहिती मिळताच झाशी रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. कारचा चक्काचूर झाल्यामुळे कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. धडकेनंतर काही वेळातच पाचही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत आणि मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक पूर्ववत केली. अपघाताचे नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.